आंजर्ले खाडीतील गाळ उपसण्यात न आल्याने खाडी गाळाने भरली आहे. वादळापासून नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आजही हर्णै बंदरातील मच्छीमार या खाडीचा आधार घेतात. वादळ झाल्यावर नौका सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हर्णै बंदर सुसज्ज जेटीअभावी कुचकामी ठरते. अशावेळी नौका सुरक्षित ठेवण्यासाठी आंजर्ले खाडीत नेऊन नांगरण्यात येतात. त्यामुळे या खाडीला महत्त्वाचे स्थान आहे.
आंजर्ले खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने होडी वाहतूक तसेच होड्या उभ्या करण्यात अडचणी येत आहेत. वर्षानुवर्षे या खाडीतील गाळ उपसण्यात न आल्याने गाळ साचून खाडी उथळ बनली आहे. खाडीच्या मुखाशीच गाळ साचल्याने नौका खाडीत घेताना अपघात होतात. गेल्या पाच वर्षात तीन नौकांना इथे जलसमाधी मिळाली आहे. मुखाजवळचा गाळ काढला गेल्यास खाडीचे पात्र खोल होईल व त्यामुळे नौका सहज खाडीत आणता येतील. वादळापासून नौका सुरक्षित ठेवण्याबरोबरच पावसाळ्यात मासेमारी बंद असताना नौका याच खाडीत किनाऱ्यावर घेऊन शाकारण्यात येतात. दरवर्षी नवीन नौकांच्या संख्येत वाढ होत असल्याने भविष्यात पावसाळ्यात नौका शाकारून ठेवण्याचे आंजर्ले खाडी प्रमुख स्थळ बनणार आहे; मात्र खाडीतील गाळ न उपसल्यास खाडी उथळ होऊन नौकांसाठी धोकादायक बनेल. याबरोबर या खाडीवर आता पूल बांधण्यात आला असला तरी पूल खाडीच्या मुखापासून बऱ्याच आत असल्यामुळे अद्यापही होडीद्वारे प्रवासी वाहतूक चालते. साचलेल्या गाळामुळे भरती ओहटीच्यावेळी पाण्याचा प्रवाह बदलतो आणि अशावेळी होडी बुडण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे जीवितहानी होण्याचा धोका आहे.
या खाडीअंतर्गत मासेमारी चालते. बोय, पालू, शिंगटी असे मासे पकडले जातात. तसेच कालव, शिंपल्या, खेकडेही पकडले जातात. या खाडीअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीमुळे अनेकांना आर्थिक लाभ होतो. अडखळ मोहल्ल्यातील काही कुटुंब तर खाडीतील खेकडे, कालवे, शिंपल्या पकडून त्या विकून गुजराण करतात. खाडीत गाळ भरून ती उथळ झाल्याने याअंतर्गत चालणाऱ्या मासेमारीला फटका बसला आहे. कारण खाडी जेवढी खोल तेवढी माशांची संख्या जास्त. याबरोबरच गाळामुळे खाडी उथळ झाल्याने उधाणाच्या भरतीच्यावेळी खाडीचे पाणी खाडीच्या दुतर्फा असलेल्या शेतांमध्ये घुसून शेतजमीन खारवट होत आहे. यासाठी आता खाडीतील गाळ उपसणे गरजेचे आहे.
(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.
No comments:
Post a Comment