Sunday, 1 August 2010

आंजर्ले येथे येऊ घातलेल्या औष्णिक प्रकल्पाला मुंबईतील चाकरमान्यांचा विरोध.

आंजर्ले येथे येऊ घातलेल्या औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले आहेत. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा कोंड, साकुर्डे, सातांबा, देहेण, चाचवळ, केळशी, माळवी, चांदिवडे, सुकोंडी, आडे, कोंगळे या गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची बैठक 25 जुलैला गोरेगाव येथे झाली. यात या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आंजर्ले परिसरात टियाना ग्रुपने औष्णिक प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पाविरोधात तीव्र पडसाद प्रकल्प जाहीर होताच उमटले. कंपनीकडून व काही तथाकथित पुढाऱ्यांकडून औष्णिक प्रकल्पांमुळे प्रदूषण होत नाही, असा डांगोरा पिटला जात आहे; मात्र पालघर डहाणू येथील औष्णिक प्रकल्पाविरोधात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पांमुळे प्रदूषण होते हे मान्य केल्याचे समजते. त्यामुळे या औष्णिक प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ एकवटले. आता पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला परवानगी नाकारली असली, तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्‍यता आहे. गावकऱ्यांकडून विरोध होत असतानाच आता या परिसरातील मुंबईतील चाकरमानीही एकवटले आहेत. 
 
25 जुलैला गोरेगाव पश्‍चिम येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये मुंबईतील चाकरमान्यांची एक सभा झाली. या सभेला बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा कोंड, साकुर्डे, सातांबा, देहेण, चाचवळ, केळशी, माळवी, चांदिवणे, सुकोंडी, आडे, कोंगळे या आंजर्ले परिसरातील गावांधमील मुंबईत कामाला असलेले चाकरमानी उपस्थित होते. शशिकांत धाडवे, गजानन पडियार, चंद्रकांत मोहिते, अरविंद वजीरकर, दिनेश जोशी, मधुकर तळवटकर यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. हा प्रकल्प आपल्या मुळावर उठणार आहे. यामुळे कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प आंजर्ले परिसरात होऊ द्यायचा नाही, असा निर्धार करण्यात आला आहे. या प्रकल्पाविरोधात हंगामी कृती समितीची स्थापनाही यावेळी करण्यात आली. या समितीच्या वतीने लवकरच आडे, केळशी, इळणे, सुकोंडी देहेण परिसरात सभा आयोजित करण्यात येणार आहे आणि ग्रामस्थांना या चळवळीत सहभागी करून घेतले जाणार आहे.


(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.

No comments: