Sunday, 16 May 2010

आंजर्ले - टियाना प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध.

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील नियोजित टियाना ग्रुपच्या औष्णिक वीज प्रकल्पाविरोधात परिसरातील जनता एकवटणार आहे. टियाना ग्रुपच्या 16800 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोळशासाठी आंजर्ले खाडीत जेटी बांधण्यात येणार आहे. या जेटीवरच जहाजामार्फत कोळसा उतरण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आंजर्ले येथील सावणे गावानजिक मुख्य केंद्र होणार आहे. या प्रकल्पामुळेआंजर्ले व परिसरातील सुमारे 300 गावे बाधित होणार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आंजर्ले परिसरात 90 टक्के व्यवसाय बागायतदारी आहे. यात आता पर्यटनाची भर पडत आहे. परंतु या प्रकल्पामुळे येथील परंपरागत व्यवसाय बागायतदारी व पर्यटन व्यवसाय या दोन्हींचे अस्तित्वच नष्ट होणार असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या प्रकल्पाला पर्यावरण व वन मंत्रालयाने प्राथमिक परवानगी नाकारली आहे. जिल्हा परिषद सदस्यांनी थेट पर्यावरण वनमंत्रालय नवी दिल्ली यांना लेखी निवेदन देऊन या प्रकल्पाला हरकत घेतली होती.

आंजर्ले येथील नियोजित औष्णिक प्रकल्पाच्या विरोधात आता मुंबईतील चाकरमान्यांनी दंड थोपटले असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. आंजर्ले परिसरातील बोरथळ, इळणे, वाघिवणे, लोणवडी, ताडाचा पोल, साकुर्डे, सातांबा आदी गावातील व अन्य परिसरातील गावातील मुंबईत कामानिमित्त असलेल्या चाकरमान्यांची नुकतीच मुंबईत बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकतीच या प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयाने परवानगी नाकारली असली तरी कंपनीकडून पुन्हा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे.

(c) Copyright 2010, Shreerang Ketkar, All Rights reserved.

1 comment:

Anonymous said...

नमस्कार, कड्यावरच्या गणपतीची कृपा आहे . ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकरची काळजी करू नये .
कुठलाही असा प्रकल्प आपल्या या गावात आई दुर्गा होऊ देणार नाही . परकीय इथे कधी टिकले नाहीत आणि टिकणार पण नाही .
अंबेचा उदयोस्तु