Tuesday, 29 December 2015

कड्यावरचा गणपती मंदीर - आंजर्ले

आंजर्ला हे एकेकाळी गणेशक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध होते. केळशी, आंजर्ला, वेळास, हर्णे, मुरूड ही गावे पेशवेकाळातील. पेशवाईच्या ऱ्हासानंतर येथील पेशवाईसंबंधित घराण्यांची राजसत्तेशी असणारी जवळीक संपुष्टात आली, तरीही त्यांचे देवाधर्माशी असलेले नाते कायम राहिले. आजही ते कायम आहे. मंदिरे ही समाजाच्या जीवनशैलीचे एक प्रतीक असते. त्या घराण्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीही खूप भक्तीभावाने या परिसरातील मंदिरे अधिकाधिक चांगली राहावीत, यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले, व चालू ठेवले.  

आंजर्ला हे दापोलीपासून साधारण २० किलोमीटर अंतरावरील गाव. येथे असलेले कडय़ावरच्या गणपतीचे देऊळ आज मोठय़ा दिमाखाने व अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असे आहे. पूर्वी आंजर्ला गाव तसे संपर्कासाठी खूप आडनिडे होते. गाडीनंतर होडीचा वापर करून खाडी ओलांडून गावात जावे लागे किंवा मंडणगडहून गाडीरस्तामार्गे जावे लागे. त्यावेळी एस.टी. बसची सेवाही तशी कमी होती. खाजगी मोटारीचे वापरण्याचे प्रमाणही कमी होते. आज तेथे पूल व रस्ता झाल्याने तेथे गाडीरस्तामार्गे जाण्यासाठी पूर्वीसारखा द्राविडी प्राणायाम  करावा लागत नाही. दापोलीहून तडक गाडीरस्तामार्गे आंजर्ल्याला पोहोचता येते. 

आंजर्ला गावाला लागून असलेल्या एका उंच डोंगरावर काळवत्री दगडात उभारलेले गणपतीचे हे देऊळ निसर्गरम्य असे स्थान आहे. देवदर्शन आणि पर्यटन अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असे हे ठिकाण आज खूप वर्दळीचे झाले आहे.

साधारण इ. स. ११५० मध्ये मूळ देऊळ बांधले गेले होते. मंदिर , आवाराची तटबंदी आणि समोरील सुदर्शन तलाव यांची रचना १२०० वर्षां पूर्वीची असावी असे अनुमान आहे. मात्र इ.स. ११०१ पासून मंदिराचे अस्तित्व सिद्ध करता येते. प्राचीन मंदिर लाकडी खांबावर गवती छपराचे असावे. इ.स. १६३० पासून नित्सुरे कुळाकडे देवस्थानाचे व्यवस्थापन आहे. प्राचीन काळात समुद्र किनारी अजरालयेश्वर म्हणजे शंकर व सिद्धीविनायकाचे मंदीर होते. अजरालय या मंदिरावरून या गावाला आंजर्ले हे नाव पडले. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. आजही भाऊबिजेला ओहोटीच्या वेळी दूर समुद्रात जुन्या बुडालेल्या मंदिराचे अवशेष दिसतात.  २००८ साली मी स्वतः तो चौथरा  पाहीला आहे. या बुडालेल्या मंदिराची स्थापना जवळच्याच उंच डोंगरावर करण्यात आली. इ.स. १७६८ ते इ.स. १७८० या १२ वर्षात, आज दिसणारे घुमटावर आधारीत २६ कळस असणारे जांभ्या दगडाने बांधलेले त्रिस्तरीय मंदिर निर्माण झाले. सुमारे २०० पायऱ्या चढून गेल्यावर माळासारखी जमीन सुरू होते. तेथे काही अंतरावर हे सुंदर देवालय आहे.

या देवळाच्या निर्मितीची पूर्वपीठिका अधिक सविस्तरपणे आज देवालयाच्या आवारात फलकावर लिहिण्यात आली आहे.

एप्रिल १९५४ सालचा फोटो 
नित्सुरे कुटुंबाचे हे मंदिर असून त्यांच्या पूर्वजांना म्हणजे रामकृष्ण हरी नित्सुरे (हर भट ) यांना दृष्टांत झाला व त्यांनी याच गावातील वासुदेव रघुनाथ घाणेकर जे पेशव्यांच्या दरबारी असलेले अधिकारी होते, त्यांच्या कानावर ही माहिती घातली, त्यांच्या सहकार्याने १७६८ ते १७८० मध्ये हे मंदीर बांधले. आज काळ्या दगडावर जीर्णोद्धार करताना त्यावर गिलावा करून देऊळ संगमरवरासारखे शुभ्र केले गेले आहे. विस्तीर्ण आवारात मध्यभागी हे गणपतीचे त्याच्या बाजूला शंकराचे देऊळ आहे. गणपतीच्या मंदिरासमोर तलाव आहे, तुळशीवृंदावन, धर्मशाळा (आता सुखसोयींनी युक्त अशी बांधली आहे.), दीपमाळा, आवाराभोवती दगडी तटबंदी असे सुंदर स्वरूप आहे. आज २०० पायऱ्या चढून जाण्याची गरज नाही. थेट मोटारही मंदिरापर्यंत जाते. इ .स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. तो पर्यंत जवळपास १० ते 1२ पिढ्या मंदिराचे व्यवस्थापन निजसुरे घराण्याकडे होते. १९९० नंतर या मंदिराला आर्थिक सुबत्ता आली  

डिसेंबर २०१५ सालचा फोटो 
६२ फूट उंचीचे मंदिर असून, लांबी ५५ फूट,रुंदी ३९ फूट. मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गोथीक शैलीचा अंमल दिसतो. मंदिरास ६ फूट उंचीचा एक दगडी तट आहे. सभामंडपावरील गोपुराची उंची ४० फूट व मुख्य मंदिरावरील गोपुराची उंची ६2 फूट असे देवालयाचे स्वरूप आहे. मंदिराची रचना त्रिस्थळी म्हणजे सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी आहे. सभागृहाला आणि गर्भगृहाच्या वर गोल घुमट आहे. गर्भगृहाच्या वर १६ उपकलश आणि अष्टविनायकाच्या रेखीव प्रतिमा आहेत. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्प दिसते. मंदिराला एकूण २६ कळस आहेत. सभागृहाला ८ कमानी आणि सुंदर घुमटाकृती छत आहे. अंतराळ हे गर्भगृहाच्या पेक्षा लहान आहे. तेथे घंटा लावलेल्या आहेत. मंदिराच्या कळसावर जाण्यासाठी वाट असून तेथून उंचावरून आजूबाजूचा परिसर, हर्णेचा किल्ला, खाडी व सागराचे दर्शन अतिशय विलोभनीय आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.

गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. ही मूर्ती दाभोळच्या धोंडू पाथरवट यांनी घडवली आहे. 


* 1954 photo courtesy - Mr. Shankar Barve

(c) Copyright 2015, Shreerang Ketkar, All Rights reserved.

Sunday, 3 August 2014

पाचुचे बेट

आंजर्ले हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी उत्तर टोकाला असलेल्या दापोली तालुक्यात वसलेले आहे. आंजर्ल्याच्या पूर्वेस मुर्डी व सुकोंडी ही गावे आहेत. पश्चिमेस हिंद महासागर, दक्षिणेस जोग नदी अथवा आन्जर्ल्याची खाडी व उत्तरेस आडे - पाडले व लोणवडी ही गावे आहेत. अर्थात, आंजर्ले हे गाव पूर्वेस सह्याद्री व पश्चिमेस हिंद महासागर यामधील अरुंद पट्टीत वसलेले आहे. आंजर्ले ग्रामपंचायतीची स्थापना 1940 साली झाली.

एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले जैवविविधतेने समृद्ध खेडे आणि दुसऱ्या बाजूला रुपेरी वाळू व माडाच्या बागांतून सागरकिनार्यावरची सफर म्हणजे आंजर्ले.

आंजर्ले बस स्थानकाच्या आजूबाजूस डोंगरावर वसलेल्या वस्तीला बिरवाडी म्हणतात. बिरवाडी किंवा बहीरवाडी हेच मूळचे आंजर्ले गाव. आंजर्ले बस स्थानकाच्या जवळ असणाऱ्या रामाच्या देवळापासून दक्षिणे कडील वस्तिला पेठपाखाडी म्हणतात. हा भाग आदिलशाहीतील शिर्के याच्या अमदानीत वसलेला आहे. समुद्राला समांतर नीटनेटके वसलेल्या परिसराला उभागर म्हणतात. उभागरातून केळशी पर्यंत जाणारा रस्ता 1730 साली बनवण्यात आला. 1858 साली या रस्त्याचे रुंदीकरण झाले.आता या रस्त्यावरून दापोली ते केळशी बस धावते.

आंजर्ले गावाच्या दक्षिणेला हर्णै व त्यापलीकडे मुरुड ही गावे आहेत. मुरूडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने खूप सोयी आहेत. मार्च महिन्यात मुरूड - हर्णै येथे 'डॉल्फिन - कासव' महोत्सव साजरा केला जातो.

आंजर्ले गाव फार पूर्वीपासून संस्कृत वेद शाळेसाठी प्रसिद्ध होते. ही वेद शाळा 1646 साली हरभट नित्सुरे यांनी स्थापन केली. या वेदशाळेत संस्कृत धार्मिक ग्रंथाचे शिक्षण गुरुकूल पद्धती प्रमाणे मोफत दिले जात होते. या वेदशाळेतून अनेक दशग्रंथी ब्राम्हण शिकून तयार झाले.

Saturday, 12 July 2014

पावसाचे संकेत - पावसाचा अंदास, अदमास

आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सांगितलेले हवामान खात्याचे पावसाचे अंदाज बरेचदा चुकतात. पण निसर्गनियमानुसार पक्ष्यांना मिळणारे अंदाज शक्यतो बरोबर असतात. पशुपक्ष्यांना पावसाळ्याआधीच तसे पूर्वसंकेत मिळतात. त्यांच्या हालचाली आणि दिनक्रमातील बदल यांच्या बारीक निरीक्षणावरुन हे संकेत लक्षात येतात.

निसर्गातल्या बदलाची पहिली चाहूल वन्यपशू-पक्ष्यांना लागते आणि मग त्यानुसार त्यांच्या वर्तनात फरक पडू लागतो. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा ऋतू कुठलाही असू दे, वातावरणातील बदल सगळ्यात आधी त्यांच्या ध्यानात येतात. त्यानुसार त्यांच्या हालचालीत बदल होतांना दिसतात. कारण पक्ष‌िजात अत्यंत संवेदनशील आणि बदलत्या हवामानाशी स्वत:ला जुळवून घेणारी निसर्गाची निर्मिती आहे. त्यातही पावसाच्या आगमनाची-विलंबाची पहिली चाहूल लागते, ती टिटवीला. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिशिर ऋतूपासून टिटवी पक्ष्यांच्या जीवन कार्याचं मी निरीक्षण करत होतो. यावेळी नोंदवलेली निरीक्षणं वैशिष्ट्यपूर्ण होती.

यावर्षी जानेवारीच्या प्रारंभीच टिटवी पक्ष्यांच्या नर-मादीच्या जोड्या घरटं बनवणं आणि मिलनकार्यात गुंतल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस मादीने घरट्यात अंडी घातली. मार्चच्या अखेरीस त्यातून पिल्लंही बाहेर पडली. जवळपास पिल्लं एक महिन्याची असतांना एप्रिलच्या अखेरीस टिटवी नर-मादीने परत मिलनकार्य सुरु केलं. मे मध्ये परत अंडी घातली आणि जून प्रारंभी परत अंड्यातून पिल्लं बाहेर पडली. जून अखेरीस पिल्लं ब‍ऱ्यापैकी मोठी झाली आणि हळुवारपणे पंखही फडफडवायला लागली. वास्तविक या पक्ष्यांच्या विणीचा एकच हंगाम असताना यावेळी मात्र त्यांनी दोनवेळा अंडी घातली. हा बदल यावर्षी उशिरा येणा‍ऱ्या पावसाचाच निदर्शक होता. कारण वातावरण, अन्नाची मुबलकता, पावसाचं आगमन आणि सुरक्षितता इ. गोष्टींचा अंदाज घेऊनच हे पक्षी विणीच्या हंगामात एकदा किंवा दोनदा आपलं प्रजोत्पादनाचं कार्य करीत असतात.

मृगनक्षत्र वेळेवर असल्याचे संकेत आफ्रिकेतून येणारे चातक पक्षी देतात. चातक पक्ष्यांचं आगमन आणि त्यांच्या 'पिऊ-पिऊ' आवाजाने माणूस सुखावतो. यावर्षी जून अखेरपर्यंत चातकाचं आगमन झालं नाही. त्यामुळे चातक पक्ष्यांचा विणीचा हंगामही लांबला जाईल. पाऊस उश‌िरानं येण्याचा अंदाज चातक पक्ष्यास आला असावा, असं वाटतं. कारण या परिसरातील नभांगणात कृष्णमेघांनी अद्यापर्यंत एकदाही रुंजी घातल्याचं दिसून आलं नाही. चातक, पावशा व कोकीळा हे पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतात.

शेतक-यांसाठी दुसरा महत्वाचा पक्षी म्हणजे पावशा. आमराईतून 'पेरते व्हा, पेरते व्हा' असा पावशाचा आवाज आला की मगत शेतकरी मशागतीच्या कामाला लागतो. आजही आपल्या देशातील बहुसंख्य गावात या पावशाच्या आगमनाची आणि आवाजाची वाट पाहिली दाते. पावशाचा हा आवाज अजूनही यावर्षी ऐकायला मिळाला नाही.

महाभारतात अर्जुनाला जसं पूर्ण पुरुष संबोधलं गेलं आहे, तसंच पक्ष्यांमध्ये कावळा या पक्ष्याला पूर्णपक्षी म्हटलं जातं. मे महिन्यात वड, पिंपळ, आंबा इ. महावृक्षांवर जर कावळ्याने घरटं केलं असेल, तर पाऊस चांगला पडतो आणि बाभूळ, सावर अशा काही काटेरी झाडांवर घरटं केलं तर पाऊस कमी पडतो, असा अनुभव आहे. माझ्या निरीक्षणाप्रमाणे यावर्षी कावळ्यांनी बाभळीसारख्या झाडांवर घरटी केली आहेत. जून महिना संपला. पावसाचा थेंब नाही. म्हणजे यावर्षी पाऊस निश्चितच लांबणार हा अंदाज कावळ्यांना आला असावा. कावळ्याचे घरटे जर झाडावर पश्चिमेकडे असेल तर पाऊस कमी पडतो. पूर्वेकडे असेल तर पाऊस भरपूर पडतो. झाडाच्या टोकावर घरटे बांधले असेल तर दुष्काळ पडतो.

पाऊस जर वेळेवर येणार असेल तर त्यापूर्वी उधईला पंख फुटतात. जमिनीतून लाखो पंखाचे किडे पावसाळयापूर्वी वारुळातून बाहेर पडतांना दिसतात. पंख फुटले की त्यांचं प्रजनन कार्य सुरु होतं. अवघ्या काही मिनिटातच आपलं जीवनचक्र पूर्ण करतात. अशा पंखांच्या किड्यांचे ढग शहराच्या काठावरील रस्त्यांवरच्या विजेच्या दिव्याखाली दरवर्षी पाहायला मिळतात. तसंच पहाटे माळरानावर किंवा मोकळ्या मैदानात अशा किड्यांवर तुटून पडणारे घारी, कोतवाल, मांजर, कोल्हे आणि सरपटणारे असंख्य जीव पाहणं ही एक वेगळीच अनुभूती असते. मी ती दरवर्षी अनुभवत असतो. यावर्षी मात्र अजूनही हे दृश्य पाहायला मिळालेलं नाही. याचा अर्थ लांबलेल्या पावसाचा अंदाज या पंखांच्या किड्यांनाही असावा.

सरपटणा-या जीवांमध्ये सर्पमादी वर्षा ऋतुचं आगमन उश‌िराने असेल तर कमी अंडी घालते. असा उल्लेख काही पुस्तकात आहे. पाऊस वेळाने आणि कमी असेल तर सापाच्या पिल्लांना कमी भक्ष्य मिळतं आणि त्यामुळे सापांची संख्या कमी होऊन ज्या पक्ष्यांचं अन्न साप आहेत, त्यांचीसुध्दा उपासभार होऊन वंशवेल पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. आणि म्हणून असे शिकारी पक्षीसुध्दा आपल्या प्रजोत्पादन कार्यात बदल करतात. त्याचप्रमाणे उंदीरसुध्दा पाऊस वेळेवर आणि भरपूर असेल तर त्यांची वीण वेळेवर होऊन पिल्लांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे उंदरावर आधारित असलेले साप व इतर जीव यांची वीणही वेळेवर होते. आणि भरपूर अन्नामुळं पिल्लांची वाढही झपाट्याने होते. यावर्षी याचं प्रमाणसुध्दा अत्यंत कमी दिसून आलं.

वृक्षराजींनासुध्दा पावसाचे संकेत कळतात. कारण सोनपिवळया फुलांचा बहावा म्हणजेच अमलतास यावर्षी मे च्या शेवटी बहरायला लागला. तो एक महिना आधी फुलायला पाहिजे होता.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या चार-पाच दशकांच्या जंगलाच्या प्रगाढ अभ्यासाप्रमाणे हरितपर्णी वृक्षांची वनं आणि शुष्कपर्णी पानगळीची जंगलं वातावरणातील बदलांचे पूर्वसंकेत देतात. जंगलातील सजीवसृष्टीच्या दिनक्रमातील आश्चर्यकारक बदलांचा अभ्यास केल्यावर पावसाबद्दलचे अचूक आडाखे बांधता येऊ शकतात. पाऊस येणार नसेल तर विणीच्या काळात हरिणी पिल्लांना जन्म देत नाही. मेळघाटच्या जंगलात गर्भवती वाघिणीने डायसकोरिया कंद खाऊन गर्भपात करवून घेतल्याची निरीक्षणं मारुती चितमपल्ली यांनी नोंदविली आहे. कारण पाऊस येणार नाही त्यामुळं रानात गवत राहणार नाही. आणि गवतच नसल्याने तृणभक्ष्यी प्राणीदेखील राहणार नाहीत. परिणामी आपल्या पिल्लांना भक्ष्य मिळणार नाही, म्हणजेच पिल्लांची वाढ होणार नाही, ती टिकणार नाहीत, याची पूर्वकल्पना वाघिणीला असल्यानेच त‌िने गर्भपात करवून घेतला, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कुठल्याही निर्मितीचा प्रमुख आधार हा त्यावेळचं वातावरण असतं. जसं सुखातून दु:ख जन्म घेतं. तसंच संकटाच्या वातावरणातून त्यावर मात करण्याचा उपायही सुचतो. निर्मिती आणि विनाश आणि विनाशातून परत निर्मिती हे निसर्गचक्र असंच सुरु राहणार आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून चालत आलेलं हे निसर्गविज्ञान आहे. त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी निसर्गावर प्रेम करणा-यांनी, निसर्ग अभ्यासकांनी पावसाळ्यापूर्वी सजीवसृष्टीत होणा-या बदलांचा अभ्यास केला पाहिजे. कारण हवामानाचा अंदाज वर्तवतांना ते अत्यंत मोलाचं ठरु शकतं.

आभार मारुती चितमपल्ली,  प्र.सु. हिरुरकर,