Wednesday, 22 June 2016

वीरगळ



रणांगणावर वीरमरण येणे हे भारतीय लोकजीवनात गौरवास्पद आणि पुण्यप्रद मानले गेले आहे. असे वीरमरण प्राप्त झालेल्या वीराचे उचित स्मारक वीरगळाच्या रूपाने गावोगावी उभारलेले आपल्याला पाहायला मिळते.

वीरगळ म्हणजे काय, आणि ते कसे असतात हा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. मुळात हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. कानडी भाषेमध्ये कल्लू म्हणजे दगड. वीराचा दगड तो वीरकल्लू, त्यावरून वीरगळ हा शब्द मराठीत प्रचलित झाला. स्थानिक लोक तर वीर गळून पडला म्हणून त्याचे स्मारक ते वीरगळ, असा अगदी सुटसुटीत अर्थ सांगतात. 

एका पाषाणाच्या शिळेवर काही विशिष्ट शिल्पांकन करून तो पाषाणस्तंभ उभा करणे आणि त्या वीराचे स्मरण करणे; तो पाषाणस्तंभ म्हणजेच वीरगळ. आपल्या लाडक्या योद्धय़ाचे स्मारक असलेले हे वीरगळ महाराष्ट्रात गावोगावी पाहायला मिळतात. पण जनमानसात त्याची माहिती फारच कमी असते. हे वीरगळ तयार करायची एक खास पद्धत आहे. आकाराने सामान्यत: अडीच ते तीन फूट उंचीच्या शिळेवर एकावर एक असे तीन किंवा चार चौकोन खोदून त्यात या वीराच्या कथेचे अंकन केलेले असते. सर्वात खाली तो वीर मृत्युमुखी पडलेला दाखवतात. त्याच्या वरच्या थरात त्याचे युद्ध चाललेले दाखवले जाते. त्याच्या वर तो मृत झाला असून त्याला अप्सरा स्वर्गात घेऊन जात असल्याचे कल्पिले आहे. तर सर्वात वरच्या चौकोनात तो शिवमय झाला असे दाखवण्यासाठी तो शिवपिंडीची पूजा करताना दाखवण्याची प्रथा आहे. युद्धात मरण आले तर तुम्हाला हमखास स्वर्गप्राप्ती होते हे जनमानसावर बिंबवणे हा देखील त्यामागील दृष्टिकोन असावा. यात अजून वर त्या पाषाणाच्या दोन बाजूंना चंद्र-सूर्य दाखवलेले असतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत आकाशात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत त्या वीराचे स्मरण आम्हाला होत राहील असे सूचित करायचे असते. मृत्युमुखी पडलेल्या वीराची पत्नी जर त्याच्यासोबत सती गेली असेल तर त्या वीरगळावर स्त्रीचा हातदेखील कोरलेला असतो. त्या हातात बांगडय़ा दाखवलेल्या असतात. काही ठिकाणी नुसताच स्त्रीचा हात कोरलेले दगड दिसतात. यांना सतीशिळा असे म्हटले जाते.

वीरगळावर कधीकधी चार वा पाच चौकटीही असतात. क्वचित दगडाच्या चारही बाजूंवर कोरीव काम केलेले आढळते. ह्या प्रकारातील वीरगळांचा काळ अकरावे ते तेरावे शतक असा सांगता येईल. दुसऱ्या प्रकारात अर्धउठावातील मानवी आकृती दिसते. ह्या प्रकारातले ‘वीर’ सतराव्या-अठराव्या शतकांतील आहेत, असे त्यांच्या शैलीवरून म्हणता येते.

वीरगळांची परंपरा कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जाते. कर्नाटकात दहा-बारा फूट उंचीचे मोठे शिल्पपट असलेले वीरगळ पाहायला मिळतात. त्यांच्यावरील युद्धप्रसंग अगदी तपशीलवर कोरलेले दिसतात. कर्नाटकात अनेक वीरगळांवर लेखदेखील कोरलेले आहेत. महाराष्ट्रात मात्र अगदी अपवादानेच लेख पाहायला मिळतात. त्यामुळे आपल्याकडचे वीरगळ हे कुठल्या वीरासाठी तयार केलेले आहेत याचा संदर्भ मिळणे कठीण जाते. 

एखाद्या गावात वीरगळ असणे हे त्या गावाचे प्राचीनत्त्व अधोरेखित करणारे असते. भूतकाळात इथे समरप्रसंग घडला होता आणि कोणी वीर धारातीर्थी पडले होते याची मूकपणाने साक्ष आज हे वीरगळ आपल्याला देत असतात. 

महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ मुख्यत्वे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा बोरिवलीपर्यंतचा भाग इतक्या प्रदेशात पसरलेले आहेत.

रायगड जिल्ह्यतल्या माणगाव तालुक्यात असलेले उंबर्डी हे गाव म्हणजे वीरगळांचे संग्रहालयच म्हणावे लागेल. इथे असलेल्या शिवमंदिराच्या आवारात अत्यंत देखणे असे ४५ वीरगळ ठेवलेले आहेत. इथे सतीचे हात असलेले अत्यंत रेखीव वीरगळ पाहायला मिळतात. कोणी महत्त्वाचा सरदार इथल्या लढाईत मृत्युमुखी पडला असणार. 

इथूनच जवळ दिवेआगरच्या रस्त्यावरील देगावला शिवमंदिरात चारही बाजूंनी घडवलेले अनेक वीरगळ ठेवले आहेत. त्यातल्या एका वीरगळावर दहा डोकी आणि वीस हात असलेल्या व्यक्तीचे अंकन केलेले दिसते. अगदी आगळावेगळा हा एकमेव वीरगळ आहे. 

आंजर्ले येथील ४ चौकटींचा विरगळ
आंजर्ले गावाच्या वेशीवर कालभैरवाचे (भैरोबाचे) देउळ आहे व तेथूनच जवळ मारुतीच्या देवळाच्या आसपास ४ ते ५ वीरगळ बघावयास मिळतात. येथे दगडाच्या एकाच बाजूला ४ चौकटींचा विरगळ आहे तसेच दगडाच्या चारही बाजूंना कोरीव काम केलेलेही विरगळ आहेत. 

बोरिवलीजवळच्या एक्सर या गावात तर वीरगळावर नौकायुद्ध दाखवलेले आहे. अत्यंत अप्रतिम असा हा वीरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यातील युद्धाचा प्रसंग दाखवणारा आहे. इतका आकर्षक आणि देखणा वीरगळ महाराष्ट्रात दुसरा नाही. 

आंजर्ले - चारी बाजूंवर कोरीव काम असलेले विरगळ
सातारा जिल्ह्यतील किकली, नगर जिल्ह्यतल्या श्रीगोंदा या गावी असेच अनेक वीरगळ दिसतात. राजापूरच्या धूतपापेश्वर मंदिराच्या बाहेर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यतील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे देखणे वीरगळ रांगेत मांडून ठेवलेले आहेत. त्याचबरोबर अनेक किल्लय़ांवर आजही असे अनेक वीरगळ विखुरलेले पाहायला मिळतात. पालीजवळील सुधागडवर अनेक वीरगळ आणि काही सतीशिळा आहेत. मुरबाडजवळील सिद्धगडावर असेच अनेक वीरगळ दिसतात. पण अशी व्यवस्था सगळ्याच वीरगळांच्या नशिबी मात्र नाही. 

अज्ञानामुळे अनेक ठिकाणी त्यांना शेंदूर फसलेला दिसतो. अनेक ठिकाणी त्यांना शनीचा दगड म्हणून तेल वाहिलेले दिसते. त्यांचा वापर हा कपडे धुण्यासाठी घासायला उत्तम दगड म्हणून करणारेही कमी नाही. रांजणगाव जवळच पिंपरी दुमाला या गावात तर मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराच्या भिंतीत अनेक वीरगळदेखील बसवलेले आढळतात. वीरगळ म्हणजे आपल्या इतिहासाचा थेट साक्षीदार असलेला ठेवा. त्याचे काळजीपूर्वक जतन करायला हवे. त्याचे संवर्धन पूर्णार्थाने शक्य नसले तरी किमान त्याची नोंद भटकंतीत करणे, गावकऱ्यांना त्याचे महत्त्व समजावून देणे इतपत तरी आपण करू शकतो. 

धन्यवाद - आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com

(c) Copyright 2016, Shreerang Ketkar, All Rights reserved.

Tuesday, 29 December 2015

कड्यावरचा गणपती मंदीर - आंजर्ले

आंजर्ला हे एकेकाळी गणेशक्षेत्र म्हणूनच प्रसिद्ध होते. केळशी, आंजर्ला, वेळास, हर्णे, मुरूड ही गावे पेशवेकाळातील. पेशवाईच्या ऱ्हासानंतर येथील पेशवाईसंबंधित घराण्यांची राजसत्तेशी असणारी जवळीक संपुष्टात आली, तरीही त्यांचे देवाधर्माशी असलेले नाते कायम राहिले. आजही ते कायम आहे. मंदिरे ही समाजाच्या जीवनशैलीचे एक प्रतीक असते. त्या घराण्यांच्या व्यतिरिक्त अन्य लोकांनीही खूप भक्तीभावाने या परिसरातील मंदिरे अधिकाधिक चांगली राहावीत, यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले, व चालू ठेवले.  

आंजर्ला हे दापोलीपासून साधारण २० किलोमीटर अंतरावरील गाव. येथे असलेले कडय़ावरच्या गणपतीचे देऊळ आज मोठय़ा दिमाखाने व अधिकाधिक सोयीसुविधांनी युक्त असे आहे. पूर्वी आंजर्ला गाव तसे संपर्कासाठी खूप आडनिडे होते. गाडीनंतर होडीचा वापर करून खाडी ओलांडून गावात जावे लागे किंवा मंडणगडहून गाडीरस्तामार्गे जावे लागे. त्यावेळी एस.टी. बसची सेवाही तशी कमी होती. खाजगी मोटारीचे वापरण्याचे प्रमाणही कमी होते. आज तेथे पूल व रस्ता झाल्याने तेथे गाडीरस्तामार्गे जाण्यासाठी पूर्वीसारखा द्राविडी प्राणायाम  करावा लागत नाही. दापोलीहून तडक गाडीरस्तामार्गे आंजर्ल्याला पोहोचता येते. 

आंजर्ला गावाला लागून असलेल्या एका उंच डोंगरावर काळवत्री दगडात उभारलेले गणपतीचे हे देऊळ निसर्गरम्य असे स्थान आहे. देवदर्शन आणि पर्यटन अशा दोन्ही गोष्टी साध्य होतील असे हे ठिकाण आज खूप वर्दळीचे झाले आहे.

साधारण इ. स. ११५० मध्ये मूळ देऊळ बांधले गेले होते. मंदिर , आवाराची तटबंदी आणि समोरील सुदर्शन तलाव यांची रचना १२०० वर्षां पूर्वीची असावी असे अनुमान आहे. मात्र इ.स. ११०१ पासून मंदिराचे अस्तित्व सिद्ध करता येते. प्राचीन मंदिर लाकडी खांबावर गवती छपराचे असावे. इ.स. १६३० पासून नित्सुरे कुळाकडे देवस्थानाचे व्यवस्थापन आहे. प्राचीन काळात समुद्र किनारी अजरालयेश्वर म्हणजे शंकर व सिद्धीविनायकाचे मंदीर होते. अजरालय या मंदिरावरून या गावाला आंजर्ले हे नाव पडले. जसजशी समुद्राची पातळी वाढू लागली तसतसे हे मंदिर पाण्यात जाऊ लागले. आजही भाऊबिजेला ओहोटीच्या वेळी दूर समुद्रात जुन्या बुडालेल्या मंदिराचे अवशेष दिसतात.  २००८ साली मी स्वतः तो चौथरा  पाहीला आहे. या बुडालेल्या मंदिराची स्थापना जवळच्याच उंच डोंगरावर करण्यात आली. इ.स. १७६८ ते इ.स. १७८० या १२ वर्षात, आज दिसणारे घुमटावर आधारीत २६ कळस असणारे जांभ्या दगडाने बांधलेले त्रिस्तरीय मंदिर निर्माण झाले. सुमारे २०० पायऱ्या चढून गेल्यावर माळासारखी जमीन सुरू होते. तेथे काही अंतरावर हे सुंदर देवालय आहे.

या देवळाच्या निर्मितीची पूर्वपीठिका अधिक सविस्तरपणे आज देवालयाच्या आवारात फलकावर लिहिण्यात आली आहे.

एप्रिल १९५४ सालचा फोटो 
नित्सुरे कुटुंबाचे हे मंदिर असून त्यांच्या पूर्वजांना म्हणजे रामकृष्ण हरी नित्सुरे (हर भट ) यांना दृष्टांत झाला व त्यांनी याच गावातील वासुदेव रघुनाथ घाणेकर जे पेशव्यांच्या दरबारी असलेले अधिकारी होते, त्यांच्या कानावर ही माहिती घातली, त्यांच्या सहकार्याने १७६८ ते १७८० मध्ये हे मंदीर बांधले. आज काळ्या दगडावर जीर्णोद्धार करताना त्यावर गिलावा करून देऊळ संगमरवरासारखे शुभ्र केले गेले आहे. विस्तीर्ण आवारात मध्यभागी हे गणपतीचे त्याच्या बाजूला शंकराचे देऊळ आहे. गणपतीच्या मंदिरासमोर तलाव आहे, तुळशीवृंदावन, धर्मशाळा (आता सुखसोयींनी युक्त अशी बांधली आहे.), दीपमाळा, आवाराभोवती दगडी तटबंदी असे सुंदर स्वरूप आहे. आज २०० पायऱ्या चढून जाण्याची गरज नाही. थेट मोटारही मंदिरापर्यंत जाते. इ .स. १९८० मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला. तो पर्यंत जवळपास १० ते 1२ पिढ्या मंदिराचे व्यवस्थापन निजसुरे घराण्याकडे होते. १९९० नंतर या मंदिराला आर्थिक सुबत्ता आली  

डिसेंबर २०१५ सालचा फोटो 
६२ फूट उंचीचे मंदिर असून, लांबी ५५ फूट,रुंदी ३९ फूट. मंदिराच्या बांधणीवर वेगवेगळ्या काळातील म्हणजे मोगल, रोमन, गोथीक शैलीचा अंमल दिसतो. मंदिरास ६ फूट उंचीचा एक दगडी तट आहे. सभामंडपावरील गोपुराची उंची ४० फूट व मुख्य मंदिरावरील गोपुराची उंची ६2 फूट असे देवालयाचे स्वरूप आहे. मंदिराची रचना त्रिस्थळी म्हणजे सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी आहे. सभागृहाला आणि गर्भगृहाच्या वर गोल घुमट आहे. गर्भगृहाच्या वर १६ उपकलश आणि अष्टविनायकाच्या रेखीव प्रतिमा आहेत. सर्व घुमटांच्या टोकाशी कमलपुष्प दिसते. मंदिराला एकूण २६ कळस आहेत. सभागृहाला ८ कमानी आणि सुंदर घुमटाकृती छत आहे. अंतराळ हे गर्भगृहाच्या पेक्षा लहान आहे. तेथे घंटा लावलेल्या आहेत. मंदिराच्या कळसावर जाण्यासाठी वाट असून तेथून उंचावरून आजूबाजूचा परिसर, हर्णेचा किल्ला, खाडी व सागराचे दर्शन अतिशय विलोभनीय आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.

गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. ही मूर्ती दाभोळच्या धोंडू पाथरवट यांनी घडवली आहे. 


* 1954 photo courtesy - Mr. Shankar Barve

(c) Copyright 2015, Shreerang Ketkar, All Rights reserved.

Sunday, 3 August 2014

पाचुचे बेट

आंजर्ले हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या अगदी उत्तर टोकाला असलेल्या दापोली तालुक्यात वसलेले आहे. आंजर्ल्याच्या पूर्वेस मुर्डी व सुकोंडी ही गावे आहेत. पश्चिमेस हिंद महासागर, दक्षिणेस जोग नदी अथवा आन्जर्ल्याची खाडी व उत्तरेस आडे - पाडले व लोणवडी ही गावे आहेत. अर्थात, आंजर्ले हे गाव पूर्वेस सह्याद्री व पश्चिमेस हिंद महासागर यामधील अरुंद पट्टीत वसलेले आहे. आंजर्ले ग्रामपंचायतीची स्थापना 1940 साली झाली.

एका बाजूला डोंगराच्या पायथ्याशी वसलेले जैवविविधतेने समृद्ध खेडे आणि दुसऱ्या बाजूला रुपेरी वाळू व माडाच्या बागांतून सागरकिनार्यावरची सफर म्हणजे आंजर्ले.

आंजर्ले बस स्थानकाच्या आजूबाजूस डोंगरावर वसलेल्या वस्तीला बिरवाडी म्हणतात. बिरवाडी किंवा बहीरवाडी हेच मूळचे आंजर्ले गाव. आंजर्ले बस स्थानकाच्या जवळ असणाऱ्या रामाच्या देवळापासून दक्षिणे कडील वस्तिला पेठपाखाडी म्हणतात. हा भाग आदिलशाहीतील शिर्के याच्या अमदानीत वसलेला आहे. समुद्राला समांतर नीटनेटके वसलेल्या परिसराला उभागर म्हणतात. उभागरातून केळशी पर्यंत जाणारा रस्ता 1730 साली बनवण्यात आला. 1858 साली या रस्त्याचे रुंदीकरण झाले.आता या रस्त्यावरून दापोली ते केळशी बस धावते.

आंजर्ले गावाच्या दक्षिणेला हर्णै व त्यापलीकडे मुरुड ही गावे आहेत. मुरूडमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने खूप सोयी आहेत. मार्च महिन्यात मुरूड - हर्णै येथे 'डॉल्फिन - कासव' महोत्सव साजरा केला जातो.

आंजर्ले गाव फार पूर्वीपासून संस्कृत वेद शाळेसाठी प्रसिद्ध होते. ही वेद शाळा 1646 साली हरभट नित्सुरे यांनी स्थापन केली. या वेदशाळेत संस्कृत धार्मिक ग्रंथाचे शिक्षण गुरुकूल पद्धती प्रमाणे मोफत दिले जात होते. या वेदशाळेतून अनेक दशग्रंथी ब्राम्हण शिकून तयार झाले.