Wednesday, 10 June 2020

निसर्ग चक्रीवादळात गावाची वाताहत. - मुक्काम पोस्ट आंजर्ले.


आंजर्ले हे दापोली तालुक्यातील समुद्र किनारी वसलेलं टुमदार गाव वस्ती तशी फारशी नाही जेमतेम दोन ते तीन हजार गावात प्रमुख व्यवसाय म्हणजे या पाच दहा वर्षात चालू करण्यात आलेला पर्यटन व्यवसाय त्याआधी आम्ही लहान पणी मामाकडे जायचो तेव्हाचा गाव म्हणजे कच्चा रस्ता त्यावरचालणारी बैल गाडी रात्री 7 नंतर लाईट हमखास जाणार किव्वा असले तरी जेमतेम पंखे जीवावर आल्यासारखे फिरणार आणि सगळे आपापली गाई गुरं घेऊन डोंगरात चरायला घेऊन जात आणि अतिशय मेहनतीने लावलेल्या माड पोफळी काजू आंबा आशा झाडांची मशागत करून शेंणगोठा करून परत संध्याकाळी आपली गुर घेऊन येणं  दूध काढून पोचवून येणं हा दिनक्रम
      पाच दहा वर्षात दिवस बऱ्यापैकी पालटले शेतीला जोडधंदा म्हणून लोकांनी पर्यटनाचा मार्गाने अर्थांजन सुरू केले हळूहळू गावाची परिस्थिती बदलली रस्ते डांबरी झाले लाईट पाणी यांची सोय उपलब्ध झाली प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तरुण पिढी दापोली नाहीतर मुंबई पुण्याकडे जाऊन  शिक्षण घेऊन पुन्हा गावात येऊन व्यवसायात पडले सगळे कसं उत्तम पण या आधीच देशावर आणि जगावर आलेल्या करोना महामारी मुळे मुख्य व्यवसायच ठप्प पर्यटक नाहीत की आंबा काजूला म्हणावी तशी मागणी नाही त्यामुळे आधीच पुढचं पीक किव्वा पर्यटन व्यवसाय सुरळीत चालू होई पर्यंत हातातील पैसे जपून काटकसरीने वापरायच सूत्र हाती घेऊन सगळे आपापल्यापरीने साठवणूक आणि पैसा जपून वापरात होते.
    सगळं कसं बऱ्यापैकी चाललं होतं .
2जूनला, सरकाने निसर्ग वादळ किनारपट्टीवर धडकणार असल्यामुळे 3 जूनला कोणीही घराबाहेर पडू नका असा सज्जड दमच भरला होता कोणाच्या ध्यानी मनी सुद्धा नसेल की या वादळाची तीव्रता इतकी  प्रचंड असेल. पाच दहा झाडे  पडतील एक अर्धा पाऊणतास वादळ होईल आणि जाईल कारण या अगोदर एवढ्या तीव्रतेने वादळ होईल याची कल्पना गावात असलेल्या आबाल वृद्धाना सुद्धा नव्हती त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात असे वादळ अनुभवलेले सुद्धा नाही
        सोसाट्याचा वारा सुटला झाडे जणू काही मंगळागौरी चा खेळ खेळत होते पण त्यांना पण समजण्याच्या आत अतिप्रचंड वेगाने सुटलेल्या वाऱ्याने याच डोलणाऱ्या झाडांना कधी जमीनदोस्त केले हे कोणालाच समजले नाही. तीव्रता जशी जशी वाढत गेली तशी तशी परिस्थिती अजून बिकट होत गेली संपूर्ण आयुष्य मेहनत करून जगवलेली झाडे तीन तासाच्या निसर्गाच्या तांडवनृत्यात भुईसपाट झाली होती, जनावरांचे गोठे पडले, घरांच्या पडव्या बसल्या, ज्याच्या घरांवर पत्रे होते ते जवळजवळ पन्नास शंभर फूट लांब जाऊन पडले सुकोंडी गावात एक आयशर टेम्पो पलटी झाला वाऱ्याचा वेग एवढा होता की माणूस तोल सावरू न शकल्याने बाजूच्या खांबावर जाऊन आदळला आणि तोंडाला जबरदस्त मार लागला काल जाऊन जी परिस्थिती बघितली ती म्हणजे भयाण स्मशान शांतता होती, गावात फक्त एक गाय सोडली तर कोणतीही जीवितहानी नाही हेच नशीब म्हणायचे पाण्याने भरलेल्या पाच हजार लिटरच्या टाक्या उडून खाली पडल्या. घरात साठवणुकीची धान्य भिजली, त्यांना मोड आलेत छप्पर गळतय. काही घरातून कुबट वास यायला लागलेला आहे. आंबा कॅनिग करायला लाईट नाही अशा अनेक गोष्टींना स्थानिक लोक सामोरे जात आहेत
    करोनाच्या भीतीपेक्षा निसर्ग वादळाने जास्त प्रमाणात घाबरायला झालं आहे आयुष्याच्या शेवटी निवृत्ती घेण्याच्या उंबरठ्यावर आज या गावकऱ्यांना पुन्हा शून्यावर आणून सोडले आहे. तरी देखील इथली माणसे गावकरी जो तो आपापल्या परीने एकमेकांना मदत करून दिलासा देत आहे जमेल तसं जे समान उपलब्ध असेल तसं कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता सढळ हस्ते मदत करत आहेत. अजूनही केळशी आडे या बाजूला इमारत साहित्य मेणबत्ती डासांची उदबत्ती ओडोमोस बिस्कीट पुडा आशा प्राथमिक गोष्टींची गरज आहे कुठेही मानव हानी झालेली नाही सर्व सुखरूप आहेत ज्यांचा संपर्क होत नसेल त्यांनी काळजी करायची गरज नाही कालच मला जमली तेव्हडी मदत घेऊन मी आंजर्ले गावात जाऊन आलो आहे. 
         सरतेशेवटी इकच जाणवलं की अजूनही आम्ही हरलेलो  नाही. निश्चित खचलो आहोत ही भावना प्रत्येकाच्या डोळ्यात आणि स्वरात जाणवत होती करायची पुन्हा सुरवात आणि हळू हळू जमेल तसं तस करायचं ह्याच शब्दांचा कल्लोळ बाकी स्मशान शांतता मनात पसरलेली होती. निघताना पाय निघत नव्हता जड अंतःकरणाने निरोप घेऊन निघताना सरतेशेवटी कुसुमाग्रज यांच्या चार ओळी आठवल्या 
              जरा एकटेपणा वाटला
               मोडून पडला संसार,
               तरी मोडला नाही कणा
               पाठीवरती हात ठेवून
                फक्त लढ म्हणा..... 
आज सार्थ अभिमान वाटला मला की मी या भगवान परशुरामांनी वसवलेल्या कोकण भूमीत जन्माला आलो या मातीतच ताकद आहे परिस्थिती कशीही असो आम्ही नेटाने धीराने चिकाटीने प्रयत्न करून त्यावर मात नक्कीच करणार.

©️ सर्वेश भावे
      गुहागर.