Sunday, 27 February 2011

टियान पॉवर प्रकल्प

टियाना ग्रुप १६ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून महाराष्ट्रात एकूण तीन वीज प्रकल्प उभारणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दोन औष्णिक वीज प्रकल्प दाभोळ आणि आंजर्ले येथे उभारले जातील. तिसरा प्रकल्प कराड येथे उभारण्यात येईल. या प्रकल्पासाठी जमिनी विकत घेताना शेतक-यांशी थेट संवाद साधून चालू बाजारभावापेक्षा अधिक मोबदला देऊन जमिनी खरेदी करण्यात येतील, असे कंपनीच्या संचालकांनी सांगितले. त्यामुळे दडवून, फसवून किंवा दडपणाने जमिनी घेतल्या अशी तक्रार राहणार नाही, असे ते एप्रिल २०१० मध्ये म्हणाले.

दापोलीच्या आंजर्ले येथे सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून १५०० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प २५०० एकर इतक्या भूभागावर असेल. सरकारने वेळेत मंजुरी दिल्यास तो तीन वर्षांच्या आत पूर्ण करता येईल. जर कोळश्यावर आधारीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली नाही तर हा प्रकल्प नैसर्गिक वायू वर चालवण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकतो. 

टियाना ग्रुप प्रकल्प उभारताना प्रथम शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा देणार असून प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या  मुलांना शिक्षणही पुरवणार आहे. तसेच हा प्रकल्प जपानी तंत्रज्ञानाच्या मदतीने ( मित्सुबिशी कंपनीची मदत घेतली जाणार आहे) उभारणार असल्याने प्रदूषणाच्या बाबतीत आपोआप काळजी घेतली जाईल. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारा दगडी कोळसा इंडोनेशियातून खरेदी करण्यात येईल.भारतीय कोळश्यातून ३७ ते ३९ टक्के राख निर्माण होते, तर इंडोनेशियन कोळश्यातून फक्त १३ टक्के राख तयार होते, कोळशापासून तयार होणारी राख कोकणाबाहेर नेऊन तेथे राखेवर आधारित प्रकल्प उभारण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच प्रदूषण नियंत्रणात ठेवणार्या वृक्षांची लागवड करण्यात येईल आणि पाण्यासाठी स्वत: धरणही बांधण्यात येईल, असे ते म्हणाले.

(c) Copyright 2011, Shreerang Ketkar, All Rights reserved.